राज्यात अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या भागात नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि इतर मंत्र्याचे दौरे सुरु झाले आहेत. मराठवाडा, सोलापूर, अहिल्यानगर इथं गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्री बांधावर जाऊन पाहणी करत आहेत. आपत्तीच्या काळात आवश्यक तिथे नियम शिथिल करुन तातडीने मदत वितरित करावी असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सकाळी सोलापूर जिल्ह्यात माढा तालुक्यातील निमगाव आणि सिना दारफळ या गावांना भेट देत पूरस्थितीची पाहणी केली.
पुरात अडकलेल्या नागरिकांना मदत करण्याचं काम एनडीआरएफनं चोख बजावल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तसंच घरात पाणी जाऊन नुकसान झालेल्या नागरिकांना ही अधिकचे नियम न लावता शासन मदत करेल, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यावेळी उपस्थित होते. मुख्यमंत्री आज लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांनाही भेट देणार आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सोलापूर जिल्ह्यातल्या पूरग्रस्त भागाचा आढावा घेतला. आपद्ग्रस्तांशी संवाद साधत त्यांनी नुकसानभरपाईसाठी त्वरित कार्यवाही करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील धाराशिव जिल्हाच्या दौऱ्यावर आहेत.
कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी जालना जिल्ह्यातल्या पूरग्रस्त भागांचा दौरा करत शेतकऱ्यांशी संवाद साधला. जालना जिल्ह्यातल्या पंचनाम्याचं काम लवकर पूर्ण करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.
जालन्याच्या पालकमंत्री आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी आज घन-सावंगी तालुक्यात भेट देऊन पाहणी केली. जलसंधारण आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी मराठवाड्यात धाराशिव, बार्शी इथल्या पूरग्रस्त गावांचा दौरा करून आढावा घेतला.