नवीन उद्योग उभारणीसाठी लागणारे परवाने कमी करून वेळेची बचत करावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत घेतलेल्या बैठकीत दिले. उद्योगांसाठीच्या सुधारणांची अंमलबजावणी करु नवे उद्योग सुरू करण्यासाठी जलद आणि सुलभ परवाने देणारं उत्कृष्ट उदाहरण देशासमोर ठेवण्याचं आवाहन त्यांनी केलं.
उद्योगासाठी लागणाऱ्या बऱ्याच परवानग्या अनेक विभागांशी संबंधित असतात. अशावेळी एकाच अर्जामध्ये संबंधित सर्व परवानग्या देण्याची व्यवस्था करावी. पुन्हा अर्ज करण्याची वेळ उद्योजकावर येणार नाही, याची काळजी घ्यावी, असं त्यांनी सांगितलं. नगरविकास विभागाने उद्योगांना लागणाऱ्या इमारत बांधकाम परवानगीसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित ऑनलाईन यंत्रणा विकसित करावी. नियमानुसार बांधकाम परवानगीसाठी अर्ज केल्यावर या यंत्रणेद्वारे आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून घेऊन संबंधिताला बांधकाम परवानगी मिळेल, असे क्रियान्वयन यातून तयार करावे. ही प्रणाली ‘ ऑटो सिस्टीम’ वर कार्यवाही करून अर्जदाराचा वेळ वाचवावा, असं ते म्हणाले.
हरित श्रेणीत येणाऱ्या उद्योगांना ठराविक कालावधीपर्यंत पुन्हा परवाना घेण्याची वेळ येणार नाही, याची खबरदारी घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.