मुंबई महानगर प्रदेश विकास योजनेच्या टप्पा ३ आणि ३A अंतर्गत नवीन रेल्वे गाड्यांची खरेदी करण्याला राज्यशासनानं मान्यता दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत हा निर्णय झाला. पहिल्या टप्प्यात तब्बल २६८ पूर्ण वातानुकूलित गाड्या खरेदी होणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
मुंबईत वडाळा डेपो ते गेटवे ऑफ इंडिया या १६ किलोमीटर लांबीच्या पूर्ण भूमिगत मार्गिकेच्या बांधकामाला, बेस्टबरोबर संयुक्त विकास प्रकल्पाअंतर्गत व्यावसायिक संकुल उभारायला, तसंच ठाणे ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळादरम्यान २५ किलोमीटर लांबीचा उन्नत मार्ग उभारायलाही मंजुरी देण्यात आली.
नागपूरमध्ये नवीन रिंग रोड उभारणी, नागपुरात एक नवनगर तयार करायला मान्यता दिल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. पुणे–लोणावळा या उपनगरीय रेल्वे मार्गाच्या चौपदरीकरणाचं काम, तसंच पुणे मेट्रोच्या टप्पा एक अंतर्गत दोन नवीन स्थानकांना मंजुरी मिळाली असल्याचं त्यांनी सांगितलं.