रखडलेले सिंचन प्रकल्प पूर्ण करून शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक भरभराट आणावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आज जलसंपदा विभागाला दिले. त्यांनी आज मुंबईत जलसंपदा विभागांतर्गत प्रकल्पांच्या भूसंपादनाचा आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. पुनर्वसित गावठाणांमध्ये सर्व नागरी सुविधांची कामं दर्जेदार करून, तिथल्या नागरिकांचं जीवनमान उंचावण्यासाठी नवीन कार्यप्रणाली तयार करावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी जमीन उपलब्धता आणि इतर आनुषंगिक विषयांसंदर्भात आयोजित बैठकीलाही मुख्यमंत्री उपस्थित होते. येत्या सप्टेंबरपर्यंत ५ हजार मेगावॅटचे प्रकल्प पूर्ण करा, त्यासाठी योजनेतल्या कामांमध्ये कोणत्याही प्रकारची दिरंगाई होता कामा नये. राज्यातल्या सर्व संबंधित यंत्रणांनी या योजनेची कामं गतीनं आणि कालबद्ध नियोजन करून करावीत, अशा सूचना त्यांनी या बैठकीत दिल्या.