आज पहिला श्रावण सोमवार. बारा ज्योतिर्लिंगांमध्ये समावेश असलेल्या राज्यातल्या शिवमंदिरांमध्ये तसंच इतर प्रसिद्ध शिवमंदिरांमधे आज पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे. मुंबईच्या बाबुलनाथ मंदिरात सकाळपासून दर्शनासाठी गर्दी झाली होती.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या घृष्णेश्वर, आणि इतर मंदिरांमध्ये पारंपरिक पद्धतीनं पूजाअर्चा आणि धार्मिक कार्यक्रम होत आहेत. मंदिरांना आकर्षक सजावट करण्यात आली असून, भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय, वाहनतळ, दर्शन रांगेची व्यवस्था इत्यादी सुविधाही करण्यात आल्या आहेत.
हिंगोलीतल्या औंढा नागनाथ मंदिरात काल रात्री दोन वाजता शासकीय महापूजा आणि दुग्धाभिषेक झाल्यानंतर मंदिर भाविकांसाठी खुलं करण्यात आलं.
नाशिक जिल्ह्यातल्या त्र्यंबकेश्वर मंदिरात तसंच ब्रह्मगिरी प्रदक्षिणा मार्गावर भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. गर्दीचं व्यवस्थापन करण्यासाठी पोलीस ड्रोनचा वापर करत आहेत. राज्य परिवहन महामंडळाने भाविकांसाठी नाशिक बस स्थानकातून २५ विशेष बसेस सोडल्या आहेत.
अकोला जिल्ह्यात गांधीग्राम इथं श्री राजराजेश्वर मंदिराजवळ कावडधारी भाविकांनी अभिषेकासाठी पूर्णा नदीचं पाणी आणण्यासाठी कालपासूनच गर्दी केली आहे. अनुचित प्रकार टाळण्यासाठी नदीपात्रात महसूल विभागातर्फे बचाव पथक आणि पोलीस दल तैनात करण्यात आलं होते.
नंदुरबार इथल्या दक्षिणकाशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तापी नदीकिनाऱ्यावरच्या केदारेश्वर मंदिरातही भक्तांनी गर्दी केल्याचं दिसून आलं. तापी नदीत सध्या पाण्याचा विसर्ग सुरु असल्याने घाट तुडुंब भरले आहेत.