दावोस दौऱ्याच्या माध्यमातून राज्यात ३० लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आली असून आणखी ७ ते १० लाख कोटी रुपयांची गुंतवणूक प्रस्तावित असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. दूरस्थ पद्धतीने झालेल्या पत्रकार परिषदेत ते आज बोलत होते. या गुंतवणूकीपैकी ८३ टक्के करार थेट परकीय गुंतवणुकीचे आहेत. १६ टक्के गुंतवणूक ही परकीय कंपन्यांची आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. यात उद्योग, सेवा, कृषि, तंत्रज्ञान या सर्व क्षेत्रांचा समावेश आहे. देशात ज्या घटकांची आयात होते, त्यासाठी पर्यायी घटकांच्या निर्मितीच्या उद्देशाने ही गुंतवणूक होत आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले.
राज्यात विविध जिल्ह्यांसाठी मोठ्या गुंतवणुकी आल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. राज्यात विविध जिल्ह्यांसाठी मोठ्या गुंतवणुकी आल्या आहेत. मुंबई तसंच, पालघर जिल्ह्यात स्टील क्षेत्रात ५६५ कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून त्यातून ८४७ रोजगार निर्मिती होईल. कोकणात १६ टक्के, विदर्भात १३ टक्के गुंतवणूक आली आहे. राज्याच्या इतर भागात ५० टक्के गुंतवणूक आली असून नाशिक, जळगाव, अहिल्यानगर, नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यात ५० हजार कोटींची गुंतवणूक, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ५५ हजार कोटी, उर्वरित विदर्भ आणि नागपूर विभागात २ लाख ७० हजार कोटी तर कोकणात साडे तीन लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.