देशाच्या इतिहासातल्या महत्त्वाच्या घटनांप्रमाणे महाकुंभाची नोंद होईल असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज लोकसभेत सांगितलं. लहानसहान सोयी सुविधांची पर्वा न करता कोट्यावधी भाविक या महामेळाव्यात सहभागी झाले होते असं ते म्हणाले. अशा उत्सवांमुळे आपल्या परंपरा, आणि वारशाचं भव्य दर्शन जगाला मिळालं असं त्यांनी सांगितलं.
प्रयागराज इथल्या संगमातलं पाणी मॉरिशसच्या दौऱ्यावर असताना आपण तिथल्या गंगा तलावात अर्पण केलं याचा उल्लेख प्रधानमंत्र्यांनी यावेळी केला. महाकुंभापासून प्रेरणा घेऊन देशभरात नदी उत्सव झाले पाहिजेत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. हा भव्य सोहळा यशस्वी झाल्याबद्दल त्यांनी सरकारचं आणि जनतेचं कौतुक केलं.
प्रधानमंत्र्यांना हे निवेदन करण्याची परवानगी कोणत्या नियमाखाली दिली, असा प्रश्न उपस्थित विरोधी पक्ष सदस्यांनी गदारोळ केला. त्यावर प्रधानमंत्री किंवा इतर मंत्री सभागृहात निवेदन करु शकतात अशी तरतूद नियमात असल्याचं सभापती ओम बिरला यांनी सांगितलं. मात्र गदारोळ चालूच राहिल्यानं कामकाज आधी एक वाजेपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब करावं लागलं.
 
									 
		 
									 
									 
									 
									