ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांचं काल रात्री पुण्यात दीर्घ आजारानं निधन झालं. ते ८३ वर्षांचे होते. भारताच्या पर्यावरण विषयक संशोधन आणि संवर्धन धोरणाला आकार देण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली. आपल्या सहा दशकांपेक्षा जास्त वैज्ञानिक कारकिर्दीत, पर्यावरणाबाबत जाणीव जागृती निर्माण करण्यासाठी त्यांनी अथक परिश्रम घेतले.
माधव गाडगीळ यांनी पुण्यातल्या फर्ग्युसन महाविद्यालयात जीवशास्त्र या विषयात पदवी मिळवली. त्यानंतर मुंबई विद्यापीठातून प्राणीशास्त्रात पदव्युत्तर पदवी, आणि १९६९ साली हार्वर्ड विद्यापीठातून पीएचडी केली. हार्वर्ड मध्ये त्यांनी गणितीय पर्यावरणशास्त्र आणि प्राण्यांच्या वर्तनावर काम केलं. भारतात परतल्यावर ते बंगळुरू इथल्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स’ या संस्थेत रुजू झाले. संस्थेच्या पर्यावरण विज्ञान केंद्राचे ते संस्थापक होते. निवृत्ती नंतर ते पुण्यातली आघारकर संशोधन संस्था आणि गोवा विद्यापीठातल्या शैक्षणिक उपक्रमांमध्ये सहभागी झाले.
गाडगीळ यांनी पंतप्रधानांची वैज्ञानिक सल्लागार परिषद, राष्ट्रीय सल्लागार परिषद आणि राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणासह अनेक उच्चस्तरीय राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये काम केलं.
पश्चिम घाटातली जैवविधता जपण्यासाठी आणि त्याचं संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी डॉ. माधव गाडगीळ यांच्या अध्यक्षतेखालच्या तज्ञ समितीने तयार केलेला ‘गाडगीळ अहवाल’ महत्वाचा ठरला.
जागतिक जैवविविधतेचं आकर्षण केंद्र असलेल्या पश्चिम घाटावरच्या त्यांच्या मोलाच्या कामगिरीबद्दल, २०२४ मध्ये, संयुक्त राष्ट्रांनी गाडगीळ यांना ‘चॅम्पियन्स ऑफ द अर्थ’ या पुरस्कारानं सन्मानित केलं होतं. संयुक्त राष्ट्रांचा पर्यावरण क्षेत्रासाठीचा हा सर्वोच्च सन्मान आहे.
गाडगीळ यांनी ‘धिस फिशर्ड लँड’ आणि ‘इकॉलॉजी अँड इक्विटी’ यासारख्या प्रभावी पुस्तकांचं लेखन आणि सह-लेखन केलं. त्यांचे २५० पेक्षा जास्त शोध-निबंध प्रकाशित झाले आहेत.
डॉ. माधव गाडगीळ यांना भारत सरकारने १९८१ मध्ये पद्मश्री आणि २००६ मध्ये पद्मभूषण पुरस्कारानं सन्मानित केलं होतं. तसंच शांती स्वरूप भटनागर पुरस्कार, व्होल्वो पर्यावरण पुरस्कार आणि पर्यावरण क्षेत्रातल्या कामगिरीसाठी टायलर पुरस्कार यासारख्या अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं.
राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी माधव गाडगीळ यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.