पॅरिसच्या लूव्र संग्रहालयातून अंदाजे ८८ दशलक्ष युरो अर्थात १०२ दशलक्ष डॉलर्स किमतीचे राजघराण्याचे दागिने चोरीला गेले आहेत. फ्रान्सच्या सरकारी वकील लॉरे बेक्को यांनी ही माहिती दिली. या दागिन्यांचं ऐतिहासिक मूल्य बाजारमूल्यापेक्षाही जास्त असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
काल सकाळी चार संशयितांनी गॅलरी दी अपोलॉन इथून क्रेनच्या सहाय्यानं ही चोरी केल्याचं त्यांनी सांगितलं. राणी मेरी-लुईस आणि महाराणी युजीन यांच्याशी सबंधित फ्रेंच राजघराण्याच्या आठ दुर्मीळ वस्तू चोरीला गेल्या असल्याचं त्यांनी सांगितलं. या चोरीचा १०० पेक्षा जास्त जण तपास करत आहेत, आणि हे दागिने नष्ट करू नयेत असं आवाहन चोरांना केल्याचंही त्यांनी सांगितलं.