१० दिवस चालणाऱ्या गणेशोत्सवाला आजपासून सुरुवात झाली. घरोघरी आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने गणरायाची प्रतिष्ठापना झाली. राज्यात सर्वत्र पारंपरिक पद्धतीनं स्थानिक वैशिष्ट्यांसह आणि नवनवीन कल्पना राबवून मंगलमूर्तींचा हा उत्सव साजरा होत आहे. यंदा गणेशोत्सवाला राज्य उत्सवाचा दर्जा मिळाल्यामुळे उत्साह द्विगुणित झालेला दिसत आहे.
राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी मुंबईत राजभवन इथं गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करुन पूजा केली. यंदाची राजभवनातली शाडूची मूर्ती नाशिक कारागृहातल्या कैद्यांनी तयार केली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी मुंबईत वर्षा निवासस्थानी श्रींच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करुन पूजा केली. राज्याच्या सर्वांगीण विकासाला गती मिळो आणि राज्यात सुख शांती नांदो अशी प्रार्थना त्यांनी केली. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनीही गणेशोत्सवानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. फडनवीस यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या दादर इथल्या निवासस्थानी भेट दिली आणि गणपतीचं दर्शन घेतलं. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही राज ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन गणपतीचं दर्शन घेतलं.
मुंबईत आज सुमारे बारा हजार सार्वजनिक, तर सव्वा लाख घरगुती गणपतींची प्रतिष्ठापना झाली. गणेशोत्सव सुरक्षितरीत्या साजरा व्हावा, यासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था केली आहे. मेट्रो, बेस्ट तर्फे भाविकांसाठी विशेष सोय करण्यात आली आहे.
पुण्यातही आज पारंपरिक उत्साहानं मानाच्या पाच गणपतींसह इतर विविध गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना झाली. गणेशोत्सवाची आरास पाहण्यासाठी निघालेल्या भाविकांच्या सोयीसाठी जिल्हा न्यायालय ते स्वारगेट मेट्रो स्थानकांवरुन उशिरापर्यंत मेट्रो सेवा सुरु राहणार आहे. गणेशोत्सवानिमित्त शहरात विविध कार्यक्रमांची रेलचेल आहे.
नागपूरवासीयांचं आराध्य दैवत टेकडी गणेशाचीही आज भक्तिपूर्ण वातावरणात प्रतिष्ठापना झाली.
राज्य शासनाच्या पर्यावरणपूरक गणेशोत्सव संकल्पनेवर आधारित गणेश मूर्तीदान उपक्रम पालघर नगरपरिषदेकडून राबवण्यात येणार आहे. तर वसई विरार महानगरपालिकेनं पर्यावरणपूरक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा आयोजित केली आहे.
नांदेड जिल्ह्यात शहरी भागात १ हजार सार्वजनिक, तर ग्रामीण भागात तीन हजाराहून अधिक मंडळाकडून श्रींची स्थापना करण्यात आली. देगलूर इथं पर्यावरणपूरक गणेशमूर्तींची स्थापना करण्यात आली. बीड शहरासह जिल्हाभरामध्ये बालगोपाळांसह ज्येष्ठांनी बाप्पांचं उत्साहाने स्वागत केलं. लातूर शहरासह जिल्ह्यात ठिकठिकाणी आज गणरायाचं मोठ्या जल्लोषात स्वागत झालं. हिंगोलीत सार्वजनिक मंडळांनी ढोलताशाच्या गजरात श्रीगणेशाची प्रतिष्ठापना केली.
नाशिकमध्ये यंदा चौदाशे मंडळांनी गणरायाची स्थापना केली आहे. गणेशभक्तांनी आज भर पावसात गणरायाचं स्वागत केलं. नंदुरबारमधला पहिला मानाचा गणपती असलेल्या श्रीमंत दादा गणपती आणि श्रीमंत बाबा गणपती यांची आज मोठ्या भक्तीभावात स्थापना करण्यात आली. धुळे शहरात बहुतांश ठिकाणी कालच मंडपात विराजमान झालेल्या गणेशमूर्तींची आज शास्त्रोक्त पद्धतीनं प्राणप्रतिष्ठा झाली. आहे. बुलडाणा जिल्ह्यातही गणेशोत्सवाला थाटामाटात प्रारंभ झाला. जळगाव जिल्ह्याच्या १६० गावांमध्ये यंदा ‘एक गाव, एक गणपती’ हा उपक्रम राबवला जात आहे.
अहिल्यानगर शहराचं ग्रामदैवत असलेल्या श्री विशाल गणेश मंदिरात आज भक्तिभावाने ‘श्रीं’ची प्रतिष्ठापना झाली. जनसामान्यांबरोबरच विविध क्षेत्रातले नामवंत मान्यवर उत्साहाने या सणाचा आनंद लुटत आहेत.