रोजगार मेळ्यात मागच्या १६ महिन्यांच्या कालावधीत ११ लाख जणांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री मनसुख मांडवीय यांनी आज लोकसभेत, एका पुरवणी प्रश्नाच्या उत्तरात दिली. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या एका अहवालानुसार गेल्या दशकात १७ कोटीहून अधिक युवकांना रोजगार मिळाला आहे, अशी माहिती त्यांनी दिली. युपीए सरकारच्या १० वर्षांच्या कार्यकाळात रोजगाराच्या केवळ ३ कोटी संधी निर्माण झाल्याचं त्यांनी सांगितलं. प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजने अंतर्गत येत्या ५ वर्षात ४ कोटीहून अधिक रोजगार संधी निर्माण करण्यासाठी सरकारनं २ लाख कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे, असंही त्यांनी सांगितलं.
काँग्रेस प्रणित सरकारच्या काळात कृषी क्षेत्रात रोजगार निर्मितीचं प्रमाण उणे १६ टक्के इतकं खाली घसरलं होतं, ते एन डी ए सरकारच्या काळात १९ टक्क्यांवर पोहोचल्याचं त्यांनी सांगितलं. उत्पादन क्षेत्रात २००४ ते २०१४ या काळात ६ टक्क्यांवर असलेलं रोजगार निर्मितीचं प्रमाण गेल्या दशकात १५ टक्क्यांपर्यंत वाढलं, असं ते म्हणाले. देशातल्या बेरोजगारांचं प्रमाण ३ पूर्णांक २ दशांश इतकं खाली घसरलं असून ते अनेक विकसित राष्ट्रांच्या तुलनेत कमी आहे, असं ते म्हणाले.