लोकसभा आणि राज्य विधानसभांच्या निवडणुका एकाच वेळी घेण्यासंदर्भातल्या संसदीय समितीचा कार्यकाळ लोकसभेनं आज वाढवला. पुढच्या वर्षीच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवसापर्यंत कार्यकाळ वाढवण्याचा प्रस्ताव समितीचे अध्यक्ष पी. पी. चौधरी यांनी मांडला आणि लोकसभेनं तो आवाजी मतदानानं मंजूर केला.
भारतात ऊर्जेचा वापर वेगानं वाढत असून येत्या २० वर्षांत जागतिक पातळीवर ऊर्जेच्या वाढत्या मागणीत ३५ टक्के वाटा भारताचा असेल, असा अंदाज आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्थेनं वर्तवला आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी आज लोकसभेत पुरवणी प्रश्नाच्या उत्तरात ही माहिती दिली. ऊर्जा आयातीवर भारत सध्या वर्षाला १५० अब्ज डॉलर खर्च करत असल्याचंही त्यांनी सांगितलं.
पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉलचं मिश्रण केल्यानं भारताचं कार्बन उत्सर्जन ७३६ लाख मेट्रिक टनांनी कमी झाल्याची माहिती रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज लोकसभेत दिली. प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान पुरवणी प्रश्नाला ते उत्तर देत होते.
विकसित देश होण्यासाठी इंधन तेल आयात कमी करण्यची गरज असल्याचं मत गडकरी यांनी मांडलं.