बिहारमधल्या मतदार याद्यांच्या पुनरीक्षणासह विविध मुद्द्यांवर विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे लोकसभेचं कामकाज ३ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. आज सकाळी लोकसभेचं कामकाज सुरु झाल्यानंतर विरोधी पक्षांनी पुनरीक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा करण्याची मागणी करत निदर्शनं सुरु केली. त्यामुळे सभापतींनी लोकसभेचं कामकाज दुपारी १२ वाजेपर्यंत तहकूब केलं. कामकाज पुन्हा सुरु झाल्यावर इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी प्रमोशन अँड रेग्युलेशन ऑफ ऑनलाईन गेमिंग विधेयक २०२५ लोकसभेत सादर केलं. ऑनलाईन गेमिंगमुळे होणारे दुष्परीणाम रोखणं, हे या विधेयकाचं उद्दीष्ट आहे. त्यानंतर लोकसभेचं कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. कामकाज पुन्हा सुरु झाल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ‘घटना दुरुस्ती विधेयक २०२५’, ‘केंद्रशासित प्रदेश सरकार विधेयक, २०२५; ‘जम्मू आणि काश्मीर पुनर्रचना विधेयक’, २०२५ लोकसभेत मांडलं. मात्र गदारोळ सुरुचं राहिल्यानं कामकाज ३ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं.