राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळीनंतर ऑक्टोबर महिन्यात सुरू होणार असून ती पुढच्या वर्षी जानेवारी महिन्यात पूर्ण होण्याची शक्यता निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी व्यक्त केली. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीची तयारी सुरू असून प्रभाग रचना, मतदार याद्या या सर्व प्रकारच्या कार्यवाहीला वेळ लागणार आहे. त्यामुळं या निवडणुका टप्प्याटप्प्याने होणार असल्याची शक्यताही त्यांनी वर्तवली.
नाशिक विभागातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक पूर्व तयारीचा त्यांनी आज आढावा घेतला, त्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते.सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणाला मान्यता दिल्याने सोडत पध्दतीने प्रभागातून आरक्षण काढण्यात येईल, असं त्यांनी सांगितले.
मतदार संख्या, मतदान केंद्र, आश्यक मनुष्यबळ, मतदान यंत्र आदींची तयारी आणि पूर्वनियोजन करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
तसंच या निवडणुकीत व्हीव्हीपॅट वापरण्यात येणार नाही असं वाघमारे यांनी स्पष्ट केलं.