निवडणुकीचं बिगुल वाजलं, ‘या’ दिवशी होणार मतदान

राज्यातल्या सर्व २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी १५ जानेवारीला मतदान होणार असून १६ जानेवारीला मतमोजणी होणार आहे. राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आज मुंबईत वार्ताहर परिषदेत ही घोषणा केली. या घोषणेनंतर सर्व महानगरपालिका क्षेत्रांमध्ये आचारसंहिता लागू झाली आहे.

 

राज्यभरातल्या २९ महापालिकांमधल्या एकंदर २ हजार ८६९ जागांसाठी ही निवडणूक होईल. त्यापैकी १ हजार ४४२ जागा महिलांसाठी, ७५९ ओबीसींच्या, ३४१ अनुसूचित जमातींसाठी आणि ७७ जागा अनुसूचित जमातींसाठी आरक्षित आहेत. मुंबई महानगरपालिका निवडणुकीची अधिसूचना उद्या, तर उर्वरित २८ महानगरपालिकांच्या निवडणुकीची अधिसूचना गुरुवारी प्रसिद्ध होणार आहे. यासाठी २३ ते ३० डिसेंबरपर्यंत केवळ ऑफलाइन पद्धतीनं अर्ज भरता येतील. या पत्रांची छाननी ३१ डिसेंबरला होईल, २ जानेवारीपर्यंत अर्ज मागे घेता येतील आणि ३ तारखेला अंतिम उमेदवार यादीसह चिन्हवाटप होईल. १३ जानेवारी २०२६ हा प्रचाराचा अंतिम दिवस असेल. सर्व महानगरपालिकांसाठी १५ जानेवारी रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होईल तर १६ जानेवारीला सकाळी १० वाजता मतमोजणीला सुरुवात होईल. मुंबई वगळता इतरत्र बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीनं निवडणूक होईल, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिली.

 

२९ महापालिकांमधल्या ८९३ प्रभागांसाठीच्या या निवडणुकीत ३ कोटी ४८ लाखांहून अधिक मतदार असून त्यांच्यासाठी ३९ हजार १४७ मतदान केंद्रं कार्यरत असतील. या निवडणुका इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रावर होणार असल्या, तरी तांत्रिक समस्येमुळं व्हीव्हीपॅटचा वापर या निवडणुकांमध्ये होणार नाही, असं वाघमारे म्हणाले. 

 

मुंबई, पुणे, नागपूर महानगरपालिकांमधल्या उमेदवारांना या निवडणुकीत जास्तीत जास्त १५ लाख रुपयांपर्यंत खर्च करता येईल. पिंपरी-चिंचवड, नाशिक आणि ठाण्यात १३ लाख, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, छत्रपती संभाजीनगर आणि वसई विरामध्ये ११ लाख, तर उर्वरित १९ महापालिकांमध्ये उमेदवारांना प्रचारावर जास्तीत जास्त ९ लाख रुपये खर्च करता येतील. 

 

१ जुलै २०२५ रोजी विधानसभा निवडणुकीच्या मतदारयादीत नाव असलेल्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात मतदान करता येईल, हे राज्य निवडणूक आयोगानं आधीच स्पष्ट केलं आहे. या निवडणुकांच्या प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या आज प्रसिद्ध झाल्या. २० तारखेला मतदान केंद्रांची आणि २७ डिसेंबरला मतदान केंद्र निहाय मतदार यादी प्रसिद्ध होईल. राज्य निवडणूक आयोगाच्या mahasecvoterlist.in या वेबसाइटवर तसंच ‘मताधिकार’ या मोबाईल ॲपवर मतदारयादीतलं नाव शोधता येईल. बहुसदस्यीय पद्धत असल्यानं या निवडणुकांमध्ये गृह मतदान शक्य नसल्याचं राज्य निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे. मात्र मतदान केंद्रांवर ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, गर्भवतींसाठी विशेष सुविधा असतील आणि त्यांना मतदानाला प्राधान्य दिलं जाईल, असंही आयोगानं नमूद केलं आहे.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.