महाराष्ट्रात ऑक्टोबर २०२४ मध्ये विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याआधी २ कोटी ३३ लाख ३३ हजार महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाला, ही संख्या आता २ कोटी ४७ लाख झाल्याची माहिती महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी आज विधानसभेत दिली. तसंच या योजनेच्या लाभार्थ्यांना २१०० रुपये मदत देण्याचा निर्णय योग्य वेळी घेतला जाईल असं त्यांनी सांगितलं. आमदार रोहित पवार, वरुण सरदेसाई यांनी याबाबत प्रश्न विचारला होता. नमो सन्मान योजनेचा लाभ मिळणाऱ्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही असं तटकरे यांनी स्पष्ट केलं. मात्र अशा महिलांना एक हजार रुपये नमो सन्मान योजनेतून आणि पाचशे रुपये लाडकी बहीण योजनेतून दिले जातील असं त्या म्हणाल्या.
समाधानकारक उत्तर न मिळाल्याने प्रश्न विचारण्याची परवानगी विरोधी पक्षाच्या सदस्यांनी मागितली. मात्र विधानसभा अध्यक्षांनी ती फेटाळून लावत पुढचं कामकाज सुरू केलं. त्यामुळे विरोधी पक्षाच्या सदस्यांनी घोषणाबाजी केली आणि सभात्याग केला.
टोरेस सारख्या गुंतवणूक कंपन्यांकडून देण्यात येणारं मोठा व्याज परतावा देण्याचं आश्वासन हा ९९ टक्के प्रकरणांमध्ये घोटाळा असतो त्यामुळे नागरिकांनी अशा प्रकारच्या गुंतवणूक करू नये असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानपरिषदेत केलं.