जागतिक अर्थव्यवस्थेतलं कामगारांचं योगदान अधोरेखित करण्यासाठी आज कामगार दिन साजरा केला जातो. कामगारांचे कामाचे तास आठ तासापर्यंत मर्यादित करण्यासाठी अमेरिकेत झालेल्या आंदोलनापासून एक मे हा दिवस कामगार दिन म्हणून ओळखला जातो. जगभरातल्या कामगारांचे हक्क आणि कामगारांच्या पिळवणूकी विरोधातली आंदोलनं यांचं प्रतिनिधित्व करणारा हा दिवस, मे दिन म्हणूनही ओळखला जातो.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी जागतिक कामगारदिनानिमित्त सर्व कामगारांना शुभेच्छा दिल्या आहेत. विकसित भारताचं स्वप्न साकार करणारे श्रमिक, आपले श्रम आणि समर्पण या माध्यमातून अर्थव्यवस्था मजबूत करत आहेत. कामगार हे राष्ट्रनिर्मितीचे सशक्त स्तंभ असल्याचं सांगून श्रमिकांचे कल्याण आणि समृद्धीसाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं त्यांनी आपल्या समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे.