कर्नाटकमधले ज्येष्ठ साहित्यिक एस एल भैरप्पा यांचं आज हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झालं. ते ९४ वर्षांचे होते. वंशवृक्ष, सार्थ, तंडा, काठ, धर्मश्री या कादंबऱ्यांसह त्यांनी विपुल लिखाण केलं आहे. त्यांच्या अंचू, आवेषण, आवरण, तंतू या कादंबऱ्यांचा मराठीत अनुवाद झाला आहे. कानडीसह मराठी आणि हिंदी भाषेत त्यांचा मोठा वाचकवर्ग होता. भैरप्पा यांना पद्मभूषण, पद्मश्रीसह साहित्यसेवेसाठी साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या निधनबाद्दल दुःख व्यक्त केलं आहे. भैरप्पा यानी साहित्य, संस्कृती आणि तत्वज्ञानाच्या क्षेत्रात अमूल्य योगदान दिल्याचं राष्ट्रपती म्हणाल्या. भैरप्पा यांनी आपल्या लिखाणातून वाचकांची विवेकजागृती केली असं प्रधानमंत्री म्हणाले. भैरप्पा यांचं भारतीय तत्त्वज्ञानाविषयीचं ज्ञान आणि सामाजिक मुद्द्यांची जाण यांनी साहित्याला समृद्ध केल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे. तर भैरप्पा यांच्या निधनामुळे साहित्यविश्वात पोकळी निर्माण झाल्याची भावना कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामैय्या यांनी व्यक्त केली.
भैरप्पा यांचं पार्थिव उद्या म्हैसूर इथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. शुक्रवारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील.