कोल्हापुरी चपलेच्या जीआय टॅगची अधिकृत नोंदणीकृत मालकी लिडकॉम आणि लिडकर या महामंडळांकडेच असल्याचं दोन्ही महामंडळांनी स्पष्ट केलं आहे.
जूनमधे इटलीच्या प्रसिद्ध ‘प्राडा’ ब्रँडनं आयोजित केलेल्या फॅशन शोमध्ये मॉडेलनं घातलेल्या लेदर सँडल्सचं डिझाइन जीआय नोंदणीकृत कोल्हापुरी चप्पलसारखं होतं. त्यावर वकिलांच्या एका गटानं प्राडाविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली, न्यायालयानं ती फेटाळली. फक्त जीआय टॅगच्या नोंदणीकृत धारक म्हणजेच महाराष्ट्र आणि कर्नाटक चर्मोद्योग विकास महामंडळांनाच अशा प्रकारची दिवाणी कारवाई करण्याचा कायदेशीर अधिकार असल्याचं न्यायालयानं सांगितलं.
या पार्श्वभूमीवर, प्राडा किंवा तत्सम आंतरराष्ट्रीय संस्थांशी कोणत्याही प्रकारचे संवाद, चर्चा किंवा प्रतिनिधित्व करण्याचा अधिकार इतर कोणत्याही व्यक्ती अथवा संस्थेला नाही, असं दोन्ही महामंडळांनी स्पष्ट केलं आहे.