मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर इथल्या सर्किट बेंचचं उद्घाटन आज सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांच्या उपस्थितीत झालं. या सर्किट बेंचचा लाभ कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सहा जिल्ह्यांना होणार आहे.
कोल्हापूरसह सहा जिल्ह्यातल्या नागरिकांना न्याय मिळवण्यासाठी दूर जावं लागतं, ही अडचण दूर करण्यासाठी हे सर्किट बेंच महत्त्वाचं असल्याचं सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई उद्घाटनपर भाषणात म्हणाले. शाहू महाराजांच्या धरतीवर सर्किट बेंचचं उद्घाटन होणं ही आनंदाची बाब आहे, देशातल्या प्रत्येक नागरिकाला संविधानाने अधिकार बहाल केले आहेत, सर्किट बेंचची स्थापना झाल्यामुळे या परिसरातल्या नागरिकांना न्याय मिळणं सुनिश्चित झालं आहे, हे सर्किट बेंच निर्माण होणं सामाजिक आणि आर्थिक न्यायाच्या स्थापनेच्या दृष्टीने मैलाचा दगड असल्याचं गवई म्हणाले. कोल्हापूरात सर्किट बेंच सुरू करण्यासाठी इमारत उबलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारने दाखवलेल्या तत्परतेबद्दल गवई यांनी कौतुक केलं.
कोल्हापूरसह सहा जिल्ह्यातल्या नागरिकांना न्याय मिळवण्यासाठी दूर जावं लागतं, ही अडचण दूर करण्यासाठी हे सर्किट बेंच महत्त्वाचं असल्याचं गवई उद्घाटनपर भाषणात म्हणाले. शाहू महाराजांच्या धरतीवर सर्किट बेंचचं उद्घाटन होणं ही आनंदाची बाब आहे, असं ते म्हणाले.
सर्किट बेंचच्या रुपाने कोल्हापूरच्या सर्वांगीण विकासाचं दालन उघडलं आहे, असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी केलं. राज्य सरकारने न्यायालयासाठी जमीन हस्तांतरित केली आहे, लवकरच आराखडा तयार करून सर्किट बेंचच्या नव्या इमारतीचं बांधकाम सुरू करू असं आश्वासन त्यांनी दिलं.
न्याय जलद मिळणं जितकं महत्त्वाचं असतं तितकंच तो आवाक्यात असणं आवश्यक आहे, त्यामुळे कोल्हापूर सर्किट बेंचचं उद्घाटन होत असताना आनंद होत आहे, असं मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती आलोक आराधे यावेळी म्हणाले. आज केवळ सर्किट बेंचचं उद्घाटन होत नाही तर कोल्हापूर आणि या परिसरातील लाखो लोकांसाठी हे एक आशास्थान आहे, असं ते म्हणाले.
न्यायालयासाठी आवश्यक त्या पायाभूत सुविधा देण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न असून याद्वारे न्यायदानाची उत्तम व्यवस्था उभी राहत असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. वकिलांच्या सुरक्षेसाठी वकिल संरक्षण कायदा आणण्याच्या मागणीचा सकारात्मक विचार सरकार करत आहे, यावर लवकरच निर्णय घेऊ असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
कोल्हापूरात सर्किट बेंच झाल्यामुळे या परिसरातल्या पक्षकारांचा पैसा आणि वेळ वाचेल, न्यायप्रक्रिया जलद होईल, असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. कोल्हापूरचे लोक गेली ४२ वर्षे ज्या क्षणाची वाट बघत होते तो क्षण आज आला आहे, या सर्किट बेंचमुळे कोल्हापुरकरांच्या घरापर्यंत न्याय आल्याची भावना शिंदे यांनी व्यक्त केली.