जम्मू-काश्मीरमध्ये श्रीनगर इथल्या दाल सरोवरात आजपासून येत्या २३ ऑगस्टपर्यंत तीन दिवसीय खेलो इंडिया जल क्रीडा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. जम्मू-काश्मीरची संस्कृती आणि नैसर्गिक सौंदर्याचा उत्सव म्हणून हा महोत्सव साजरा होत आहे. खेलो इंडिया जल क्रीडा महोत्सवाचा शुभंकर हिमालयीन किंगफिशरपासून प्रेरित आहे, जो साहस, ऊर्जा आणि निसर्गाशी असलेलं खोल नातं सांगतो.
या महोत्सवात एकूण ३६ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधले ५०० पेक्षा जास्त खेळाडू रोइंग, कॅनोइंग आणि कायाकिंग या स्पर्धात्मक क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होतील. यावेळी वॉटर स्कीइंग, ड्रॅगन बोट आणि शिकारा शर्यत यासारखे जल क्रीडा प्रकारही सादर होतील.
भारतीय क्रीडा प्राधिकरण आणि जम्मू-काश्मीर क्रीडा परिषदेनं संयुक्तपणे आयोजित केलेला हा महोत्सव सरकारच्या ‘खेलो भारत’ धोरणाचा भाग असून, तळागाळातल्या क्रीडा प्रतिभेला प्रोत्साहन देणं, उपजीविकेचं साधन निर्माण करणं आणि स्थानिक पायाभूत सुविधांचं पुनरुज्जीवन करणं, हे या उपक्रमाचं उद्दिष्ट आहे.