यंदाच्या खरीप हंगामात ११ कोटी २१ लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर पेरणी झाली आहे. भाताचं पेरणी क्षेत्र सरासरी ४ कोटी ३ लाख हेक्टरहून अधिक होतं ते यंदा ४ कोटी ४१ लाख हेक्टरपेक्षा जास्त झालं आहे. कापसाचं पेरणी क्षेत्र सरासरी १ कोटी २९ लाख हेक्टर होतं ते यंदा १ कोटी १० लाख हेक्टरपर्यंत खाली आलं आहे.
मक्याच्या पेरणी क्षेत्रात यंदा १२ टक्क्यापेक्षा जास्त वाढ झाल्यानं भरडधान्याच्या उत्पादनात लक्षणीय वाढ अपेक्षित आहे. गेल्या चार वर्षात सरासरी ७८ लाख ९५ हजार हेक्टर क्षेत्रावर मका पेरला गेला. यावर्षी हे क्षेत्र ९४ लाख ९५ हजार हेक्टरवर गेलं आहे.
डाळी आणि गळिताचं क्षेत्र मात्र घटलं आहे. डाळींचं पेरणी क्षेत्र गेल्या ४ वर्षात सरासरी १ कोटी २९ लाख हेक्टर होतं ते यंदा १ कोटी २० लाख हेक्टरपर्यंत खाली आलं आहे. गळीत पिकांचं क्षेत्र यंदा १ कोटी ९० लाख १३ हजार हेक्टर इतकं आहे. ऊसाचं पेरणी क्षेत्र सरासरी ५२ लाख ५१ हजार हेक्टर होतं ते यंदा ५९ लाख हेक्टरच्या पुढे गेलं आहे.