उत्तराखंडमध्ये हेलिकॉप्टर अपघातात सात जणांचा मृत्यू, मृतांमध्ये यवतमाळच्या तिघांचा समावेश

उत्तराखंडमध्ये केदारनाथ परिसरात असलेल्या गौरीकुंड खार्क या डोंगराळ भागात आज सकाळी एक हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या अपघातात सहा यात्रेकरू आणि पायलटसह सात जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये यवतमाळच्या वणी इथल्या जयस्वाल कुटुंबातल्या तीन जणांचा समावेश आहे.

 

हे हेलिकॉप्टर केदारनाथहून गुप्तकाशीला जात होतं. घटनेची माहिती मिळताच, बचाव पथकं घटनास्थळी रवाना झाली आणि मदत आणि बचाव कार्याला सुरूवात झआली.  ‘एसडीआरएफ’, अर्थात, ‘राज्य आपत्ती निवारण दला’नं दिलेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त हेलिकॉप्टर पूर्णपणे जळलं असून सर्व मृतदेह बाहेर काढले आहेत. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी या अपघाताबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे.

 

‘विमान अपघात तपास विभाग’ या अपघाताची चौकशी करणार आहे. धामी यांनी हेलिकॉप्टर सेवा दोन दिवसांसाठी स्थगित करायचे आदेश दिले आहेत. या अपघाताबद्दल तीव्र दुःख व्यक्त करून प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राध्यान्य असल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच चौकशीनंतर हेलिकॉप्टर सेवा पुन्हा सुरू केली जाईल, असं सांगितलं. ‘डीजीसीए’ अर्थात, नागरी विमान वाहतूक महासंचालनालय परिस्थितीवर बारकाईनं लक्ष ठेवून आहे. यापुढे  कोणती कारवाई करायची, याचा आढावा घेतला जात आहे.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.