कार्तिकी एकादशीनिमित्त आज विठ्ठल मंदिरांमधे गर्दी झाली आहे.
कार्तिक शुद्ध एकादशी हा चातुर्मासाचा समारोप मानला जातो. आषाढी एकादशीपासून सुरु केलेली अनेक व्रत वैकल्यं आणि उपक्रमांचं उद्यापन केलं जातं. आषाढ शुद्ध एकादशीला निद्रधीन झालेले देव आज कार्तिक एकादशीला जागे होतात अशी लोकधारणा आहे. आषाढीप्रमाणेच कार्तिकी एकादशीला देखील पंढरपूरची वारी केली जाते. कार्तिकी एकादशी निमित्त आज पहाटे पंढरपूर इथं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विठ्ठलाची शासकीय महापूजा सपत्नीक केली. राज्यात झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांवरचं संकट दूर करावं असं साकडं शिंदे यांनी विठुरायाला घातलं.
यावेळी मानाचे वारकरी म्हणून नांदेड जिल्ह्यातले रामराव आणि सुशिलाबाई वालेगावकर या दांपत्याला विठ्ठलाची महापूजा करण्याचा मान मिळाला. विशेष म्हणजे यंदा जिल्हा परिषद शाळेतल्या दोन विद्यार्थ्यांनाही पूजा करण्याचा मान देण्यात आला. मानाच्या वारकऱ्यांना राज्य परिवहन-एसटीचा मोफत पास आता एक वर्षा ऐवजी कायमस्वरूपी देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केली. एकादशीमुळे पंढरपूरात पहाटेच लाखो भाविकांनी चंद्रभागा नदीत पवित्र स्नान केलं. महाराष्ट्रासह, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि इतर राज्यांतून सुमारे आठ लाख भाविक पंढरपूरात दाखल झाले असून ‘ज्ञानोबा माऊली तुकाराम’च्या जयघोषानं परिसर दुमदुमला.