देशभर आज कारगिल विजय दिवस साजरा होत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज कारगिल विजय दिनानिमित्त देशासाठी बलिदान देणाऱ्या शूर सैनिकांना आदरांजली वाहिली. हा दिवस देशाच्या सैनिकांचं असाधारण शौर्य, धैर्य आणि दृढनिश्चयाचं प्रतीक आहे, असं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना कारगिल विजय दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. आजच्या दिवशी, देशाच्या आत्मसन्मानाचं रक्षण करण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या भारत मातेच्या वीर सुपुत्रांचं आपण स्मरण करतो असं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.
लडाखमध्ये, २६ व्या कारगिल विजय दिवस सोहळ्याचा भाग म्हणून, कारगिल युद्धातल्या वीरांना आदरांजली वाहण्यासाठी आज सकाळी द्रासमध्ये एक भव्य पदयात्रा आयोजित करण्यात आली होती. या पदयात्रेत तरुण, माजी सैनिक, सशस्त्र दलाचे कर्मचारी, शहीद जवानांचे कुटुंबीय आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
केंद्रीय युवा कल्याण आणि क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडवीय आणि संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ यांनी पदयात्रेचं नेतृत्व केलं.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज कारगिल विजय दिना निमित्त्त नवी दिल्ली इथल्या राष्ट्रीय युद्ध स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करून वीर जवानांना आदरांजली वाहिली. भारतीय लष्कराच्या वीर जवानांनी कठीण परिस्थितीतही देशाच्या सन्मानाचं रक्षण करताना असाधारण धैर्य आणि दृढनिश्चय दाखवला, असं ते यावेळी म्हणाले.
लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी आज २६ व्या कारगिल विजय दिनानिमित्त कारगिल युद्ध स्मारकात शहीद जवानांना आदरांजली वाहिली. कर्तव्य बजावताना प्राणांची आहुती देणाऱ्या योद्ध्यांच्या कुटुंबियांना संपूर्ण देश सलाम करतो, असं ते यावेळी म्हणाले.
संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह, संरक्षण दल प्रमुख जनरल अनिल चौहान, हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल ए पी सिंग आणि नौदल प्रमुख ॲडमिरल दिनेश के त्रिपाठी यांनीही आज कारगिल विजय दिनानिमित्त देशाच्या वीर जवानांना आदरांजली वाहिली.