ज्येष्ठ अभिनेत्री कामिनी कौशल यांचं आज मुंबईतल्या त्यांच्या घरी वार्धक्याने निधन झालं. त्या ९८ वर्षांच्या होत्या. २४ फेब्रुवारी १९२७ रोजी लाहौर इथे जन्मलेल्या कामिनी कौशल यांनी १९४६मध्ये नीचा नगर या चित्रपटापासून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती.
हा चित्रपट कान चित्रपट महोत्सवात त्यावर्षीचा सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला होता. दो भाई, नदिया के पार, जिद्दी, पारस, आदर्श, आरजू, झांझर, आबरू, जेलर, नाईट क्लब हे त्यांचे काही गाजलेले चित्रपट आहेत. २०२२मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘लाल सिंग चढ्ढा’ तसंच, २०१९मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘कबीर सिंग’ या चित्रपटांमध्येही त्या झळकल्या होत्या. कौशल यांच्या निधनामुळे हिंदी चित्रपटसृष्टीतल्या एका युगाचा अंत झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे.