कोविडमुळे गेली ४ वर्षं स्थगित असलेली कैलास मानसरोवर यात्रा येत्या ३० जूनपासून पुन्हा सुरु होत आहे. यंदा यात्रेकरू उत्तराखंड मार्गाने कैलास मानसरोवरसाठी रवाना होणार असून, उत्तराखंड सरकार आणि परराष्ट्र मंत्रालयाच्या देखरेखीखाली यात्रा आयोजित केली जाईल. कुमाऊं मंडळ विकास निगम कडे यात्रेच्या व्यवस्थापनाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
ही यात्रा यंदा दिल्लीपासून सुरू होईल आणि पिठोरागड जिल्ह्यातल्या लिपुलेख खिंडीतून यात्रेकरू चीन मध्ये प्रवेश करतील. एकूण २५० यात्रेकरू २२ दिवसांच्या या खडतर प्रवासात सहभागी होत आहेत. इंडो-तिबेट सीमा पोलिस दलाच्या सहाय्याने दिल्ली आणि पिठोरागडमध्ये गुंजी इथं यात्रेकरूंची वैद्यकीय तपासणी केली जाईल. कैलास मानसरोवर इथं जाणाऱ्या यात्रेकरूंना ५०च्या पाच तुकड्यांमध्ये विभागण्यात आलं असून, यात्रेकरूंचा पहिला गट १० जुलै रोजी चीनमध्ये प्रवेश करेल, तर शेवटचा गट २२ ऑगस्ट रोजी परत येईल.