भारतीय राज्यघटनेतली मूलभूत तत्वं आणि मूलभूत अधिकार हे घटनेचा आत्मा आहेत, या दोन्हींचा एकत्र विचार करून सामाजिक आणि आर्थिक न्यायासाठी काम केलं पाहिजे, असं सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत विधानभवनाच्या मध्यवर्ती सभागृहात उपस्थितांना संबोधित करत होते. कुठल्याही पदासोबत जबाबदारीही येते आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे पाईक असलेल्या मला सरन्यायाधीश पदाची जबाबदारी मिळाली ही अभिमानाची गोष्ट आहे असं ते म्हणाले. यावेळी त्यांनी राज्य घटनेमागची बाबासाहेबांची भूमिका उपस्थितांना समजावून सांगितली. घटना दुरुस्ती करून राज्य घटनेच्या मूळ गाभ्याला धक्का लावता येत नाही याचा पुनरुच्चार त्यांनी केला. युद्ध आणि संकटाच्या काळात भारतीय राज्य घटनेनं देशाला जोडून ठेवलं, असंही त्यांनी सांगितलं.
भाषणाआधी न्यायमूर्ती गवई यांचा सत्कार मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आला. व्यापक जनहितासाठी गवई यांनी कायद्याचा वापर केला असं मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यावेळी म्हणाले. पहिल्यांदाच सरन्यायाधीशांचा सत्कार विधान भवनात होत असल्याची प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली. तर हा सत्कार ऐतिहासिक असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. हा सत्कार म्हणजे राज्यातल्या जनतेचा आशीर्वाद असल्याची प्रतिक्रिया न्यायमूर्ती गवई यांनी सत्काराला उत्तर देताना व्यक्त केली.विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यासह विविध मान्यवर यावेळी उपस्थित होते.