वंदे मातरम हा देशाचा आत्मा जागृत करण्याचा मंत्र आणि देशाच्या पुनर्निर्माणाचं आवाहन आहे, असं प्रतिपादन राज्यसभेचे सभागृह नेते जे. पी. नड्डा यांनी केलं. वंदे मातरम या गीताच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त चर्चेचा समारोप करताना ते बोलत आहेत. या चर्चेत ८० पेक्षा जास्त खासदारांनी भाग घेतला असून स्वातंत्र्यसंग्राम न पाहिलेल्या आजच्या तरुण पिढीला या चर्चेद्वारे याबाबत सखोल माहिती मिळेल आणि भविष्याची प्रेरणा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
तत्पूर्वी, दिवाळीचा समावेश युनेस्कोच्या अमूर्त वारसा यादीत झाल्याबद्दल आज राज्यसभेच्या सदस्यांनी आनंद व्यक्त केला. देशात डिजिटल पत्ता प्रणाली सुरू करण्यासाठी सरकार काम करत आहे, अशी माहिती सरकारनं आज राज्यसभेत दिली. न्यायपालिकेची स्वायत्तता अबाधित राखणं आणि न्यायदानासाठी पोषक वातावरण निर्माण करण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे, अशी ग्वाही कायदा आणि न्यायमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी आज दिली. याबाबत विचारलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते.