रशिया – युक्रेन युद्ध थांबवण्यासाठी अमेरिकेने तयार केलेल्या शांतता योजनेच्या मसुद्यावर आज अमेरिका आणि युक्रेनचे उच्चाधिकारी तसंच फ्रांस, ब्रिटन आणि जर्मनीचे सुरक्षा सल्लागार जिनिव्हा इथे चर्चा करणार आहेत. अमेरिकेचे विशेष प्रतिनिधी स्टीव्ह विटकॉफ आणि परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यावेळी उपस्थित असतील. याविषयी आपण युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांच्याशी नंतर चर्चा करणार असल्याचं कॅनडाचे प्रधानमंत्री मार्क कार्नी यांनी म्हटलं आहे.
अमेरिकेच्या शांतता योजनेत रशियाच्याच मागण्या पुढे केल्या असून युक्रेनच्या मागण्या समाविष्ट करण्यासाठी त्यावर अधिक चर्चा करण्याची गरज आहे असं युरोपियन नेत्यांचं म्हणणं आहे. अमेरिकेच्या पाठिंब्यासाठी आपण युक्रेनचे स्वातंत्र्य पणाला लावले असल्याचं युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी म्हटलं आहे. तर ही योजना म्हणजे युद्धावरच्या तोडग्यासाठी टाकलेलं पहिलं पाऊल असल्याचं रशियाचे अध्यक्ष पुतीन यांनी म्हटलं आहे. या योजनेच्या मंजुरीसाठी अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी येत्या गुरुवारपर्यंतची मुदत दिली आहे.