जवाहरलाल नेहरु बंदरापासून चौकपर्यंत ६ पदरी ग्रीन फील्ड महामार्ग बांधणी प्रकल्पाला आज केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता मिळाली. या बैठकीनंतर, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. या प्रकल्पावर साडेचारहजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. पीएम गतीशक्ती राष्ट्रीय आराखड्याअंतर्गत हे काम होणार असून त्यामुळे एएनपीए आणि नवी मुंबईतला नवीन विमानतळ यांच्यातला संपर्क वेगवान होणार आहे.
भीम युपीआय मार्फत लहान मूल्याचे व्यवहार करण्यासाठी प्रोत्साहन देणाऱ्या सुमारे दीडहजार कोटी रुपयांच्या योजनेलाही आज केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. या योजनेनुसार लहान व्यापाऱ्यांना युपीआय सेवेसाठी अवांतर खर्च येणार नाही.
देशांतर्गत दूध उत्पादन वाढवण्यासाठी आणि पर्यायाने शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी राबवण्याच्या सुधारित गोकुळ अभियानाला आजच्या बैठकीत मान्यता मिळाली असून येत्या दोन वर्षात त्यासाठीची अर्थसंकल्पीय तरतूद वाढवण्यात आली आहे.