डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

देशभरात जन्माष्टमीचा उत्साह

राज्यात गोकुळाष्टमीचा सण उत्साहात साजरा होत आहे. श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि दहीहंडीनिमित्त राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दहीहंडीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

राज्यात विविध ठिकाणी दहीहंड्याचं आयोजन करण्यात आलं आहे. दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदा पथकांमध्ये ही उत्साह असून गेल्या दोन महिन्यांपासून सराव केलेली दहीहंडी पथकं मानवी मनोरे रचत आहेत. 

ठाण्यात प्रताप सरनाईक फाऊंडेशन आणि संस्कृती युवा प्रतिष्ठान आयोजित संस्कृती दहीहंडी मध्ये १० थर रचत कोकण नगरचा राजा गोविंदा पथकानं विश्वविक्रमाची नोंद केली. त्यांना २५ लाख रुपयाचे पारितोषिक जाहीर करण्यात आलं आहे. 

मुंबईत जोगेश्वरी इथली दहीहंडी जय जवान गोविंदा पथकानं ९ थर लावून फोडली, तर दादरमधली आयडियल दहीहंडी महिला गोविंदा पथकानं फोडली. वरळी जांबोरी मैदान इथं भाजपाचे संतोष पांडे यांनी दहीहंडी उभारली आहे. ही दहीहंडी फोडण्यासाठी पथकांनी मोठी गर्दी केली आहे. शहर आणि उपनगरांत विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी लाखो रुपये बक्षीस असलेल्या दहीहंड्या उभारल्या आहेत. यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि सेलिब्रिटींचीही रेलचेल आहे. दहीहंडीदरम्यान जखमी झालेल्या सर्व गोविंदांवर मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांत निःशुल्क उपचार करण्यात यावेत, असे निर्देश पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी महानगरपालिकेच्या सर्व रुग्णालयांचे अधिष्ठाता आणि वैद्यकीय अधीक्षकांना दिले आहेत. दहीहंडींमुळे मुंबई आणि ठाण्यात २२ मार्गांवरची बेस्टची वाहतूक वळवण्यात आली आहे.

  नागपूरच्या महाल परिसरात बडकस चौक मित्र परिवाराच्या वतीने बडकस चौकात दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या दहीहंडीला भेट दिली.