November 15, 2025 1:49 PM | JammuKashmir Blast

printer

जम्मू काश्मीरमध्ये नौगाम पोलीस ठाण्यात स्फोट, ९ जणांचा मृत्यू

जम्मू काश्मीरमधील नौगाम पोलीस ठाण्यात काल रात्री स्फोटकांचा अपघाती स्फोट होऊन नऊ जणांचा मृत्यू झाला. गृह मंत्रालयाच्या जम्मू आणि काश्मीर विभागाचे सहसचिव प्रशांत लोखंडे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या स्फोटात २७ पोलीस, दोन महसूल अधिकारी आणि तीन नागरिक जखमी झाले आहेत. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

 

हरियाणाच्या फरीदाबाद इथून जप्त केलेल्या स्फोटकांची तपासणी सुरू असताना काल रात्री उशीरा हा स्फोट झाला. ही स्फोटकं पोलीस ठाण्याच्या परिसरात मोकळ्या जागेत सुरक्षित ठेवण्यात आली होती. न्यायसहाय्यक पथक याची तपासणी करत होतं. स्फोटामुळे पोलीस ठाणं आणि आसपासच्या काही इमारतींचंही नुकसान झालं आहे. स्फोटाच्या कारणाचा शोध सुरू आहे, असंही लोखंडे यांनी सांगितलं. 

 

दरम्यान, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी या घटनेबद्दल शोक व्यक्त केला. गुप्तचर आणि दहशतवाद विरोधी यंत्रणा बळकट करण्यासाठी केंद्र सरकारनं आता तरी जागं व्हावं, असं आवाहन त्यांनी केलं.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.