हिमाचल प्रदेशात जोरदार हिमवृष्टीमुळे जनजीवनावर परिणाम झाला आहे. अनेक ठिकाणी बर्फ साचल्यानं वाहतूक ठप्प झाली आहे तसंच पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी पर्यटकांची वाहनं अडकून पडली आहेत तसंच वीजपुरवठाही खंडित झाला आहे. राजधानी शिमला इथं उंचावरच्या भागात काल रात्री पुन्हा जोरदार हिमवृष्टी झाली. चंबा, किन्नौर आणि कुल्लू जिल्ह्यांमधेही सतत हिमवृष्टी होत आहे. येत्या मंगळवारपर्यंत हिमवृष्टी होत राहील असा इशारा हवामान विभागानं दिला आहे.
उत्तराखंडमधेही उत्तरकाशी जिल्ह्यात हिमवृष्टीमुळे १२ महत्त्वाचे रस्ते बंद झाले आहेत. चौरंगीमधे अडकलेल्या सुमारे २०० जणांना प्रशासनाने सुरक्षितपणे बाहेर काढलं आहे. चारधाम क्षेत्र पूर्णपणे हिमाच्छादित आहे.
जम्मू काश्मीरमधे राष्ट्रीय महामार्ग ४४ सह श्रीनगरमधले प्रमुख रस्ते बंद झाले आहेत. पर्यटकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आणि या रस्त्यांवरुन प्रवास टाळावा असं आवाहन पोलिसांनी केलं आहे.