जालियनवाला बाग हत्याकांडाला आज १०६ वर्षं पूर्ण होत आहेत. या हत्याकांडात बळी पडलेल्या हुतात्म्यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी समाजमाध्यमावर आदरांजली वाहिली आहे. जालियानवाला बाग मैदानावर भारत मातेच्या स्वातंत्र्यासाठी शहीद झालेल्यांना आपण आदरांजली अर्पण करत असून भारताची जनता सदैव त्यांची ऋणी राहील. त्यांच्या प्रेरणेने भारताचा प्रत्येक नागरिक देशाच्या प्रगतीसाठी आपलं योगदान देत राहील, असं मुर्मू आपल्या संदेशात म्हणाल्या आहेत.
देशाच्या स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात या शूरांचं अतुलनीय बलिदान कोरलं गेलं असून देश त्यांचा सदैव ऋणी राहील, असं उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी जालियनवाला बाग हत्याकांडातल्या शहिदांना आदरांजली वाहताना म्हटलं आहे.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही जालियनवाला बाग हत्याकांडातल्या शहीदांना आदरांजली वाहिली आहे. जालियनवाला बाग हत्याकांड हा देशाच्या इतिहासातला एक काळा अध्याय होता पण या हत्याकांडात शहीद झालेल्यांचं बलिदान स्वातंत्र्य लढ्यातला एक महत्त्वाचा टप्पा ठरला. त्यामुळे येणाऱ्या पिढ्यांना हे बलिदान सदैव प्रेरणादायी राहील, असं प्रधानमंत्री आपल्या संदेशात म्हणाले आहेत.
१३ एप्रिल १९१९ हा दिवस देशाच्या स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासातील सर्वांत काळा दिवस असून ही घटना देशाच्या इतिहासातून कधीच पुसली जाऊ शकत नाही. या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या तमाम देशभक्त वीर हुतात्म्यांना आदरांजली, अशा शब्दांत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आदरांजली वाहिली आहे.