डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

विधानपरिषदेत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वसतिगृहात अंमली पदार्थ आढळल्याचा मुद्दा

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वसतिगृहात मे महिन्यात अंमली पदार्थ आढळून आल्याचा मुद्दा आमदार विक्रम काळे यांनी उपस्थित केला. हा प्रश्न राज्यातल्या सर्व शासकीय महाविद्यालयांच्या सुरक्षिततेचा असल्याचं आमदार विक्रम काळे यांनी सांगितलं. तसेच, सुरक्षिततेच्यादृष्टीने कोणत्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत आणि या प्रकरणाच्या तपासासाठी स्थापन केलेल्या समितीचा अहवाल कधी येणार आहे असा सवालही आमदार विक्रम काळे यांनी विधानपरिषदेत उपस्थित केला. 

 

उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या लक्षवेधीला उत्तर दिले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वसतिगृहात मे महिन्यात अंमली पदार्थ आढळून आल्याच्या दुसऱ्याच दिवशी सर्व पावलं उचलण्यात आली असल्याची माहिती मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. या प्रकरणी एफआयआरही दाखल करण्यात आला असल्याचं त्यांनी सांगितलं. स्थापन केलेल्या समितीचा अहवाल हाती येताच योग्य कार्यवाही केली जाईल, असंही पाटील यांनी नमूद केलं. तसेच, विद्यापीठाच्या आवारात बाहेरच्या व्यक्तींना प्रवेश देण्यासंदर्भात नियमावली तयार केल्याचंही त्यांनी सांगितलं. गेल्या काही दिवसांत घडलेल्या घटनांच्या आधारे सर्व पुणे शहरंच या विळख्यात अडकल्याचं चित्र निर्माण केलं जात आहे, मात्र ते योग्य नाही, असंही पाटील यांनी नमूद केलं.