इस्रो, अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं आज आंध्र प्रदेशातल्या श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून सीएमएस-३ या देशाच्या सर्वात वजनदार दूरसंवाद उपग्रहाचं प्रक्षेपण केलं. एलव्हीएम-३ या देशातल्या सर्वात शक्तिशाली उपग्रह प्रक्षेपकाच्या सहाय्यानं त्याचं प्रक्षेपण करण्यात आलं. अवकाशात ४ किलो पर्यंत वजन वाहून नेण्याची त्याची क्षमता असून, या प्रक्षेपकानं चांद्रयान-३ सारख्या मोहिमा यशस्वीपणे पार पाडल्या आहेत.
सीएमएस-३ हा लष्कराचा मल्टी-बँड दूरसंवाद उपग्रह असून, त्याला जीसॅट–7 आर असंही म्हणतात. हा उपग्रह भारतीय भूभागासह लगतच्या महासागराच्या विस्तृत क्षेत्रात सेवा देईल, असं इस्रोनं आपल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे. सीएमएस-३ उपग्रह भारतीय नौदलाच्या संपर्क यंत्रणेत लक्षणीय सुधारणा घडवेल. तसंच तो उच्च-क्षमतेची बँडविड्थ देखील प्रदान करेल, त्यामुळे दुर्गम भागांशी डिजिटल माध्यमातून संपर्क साधता येईल.