भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोनं निसार या कृत्रिम अपर्चर रडार उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण केल्याबद्दल आज संसदेच्या दोन्ही सभागृहात इस्रोच्या वैज्ञानिकांचं अभिनंदन करण्यात आलं. या उपग्रहाचं काल श्रीहरिकोटा इथल्या अवकाश केंद्रावरुन यशस्वी प्रक्षेपण झालं. इस्रो आणि नासाच्या सहकार्यातून यशस्वी झालेला हा प्रकल्प भारताची अंतराळ क्षेत्रातली वाढती क्षमता अधोरेखित करतो असं उपाध्यक्ष हरिवंश म्हणाले.
लोकसभेत सभापती ओम बिरला यांनी इसरोच्या वैज्ञानिकांचं अभिनंदन करुन त्यांना भविष्यातल्या कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या.
बिरला यांनी नंतर प्रश्नोत्तराचा तास पुकारण्याचा प्रयत्न केला. मात्र बिहारमधलं मतदार याद्यांचं पुनरिक्षण आणि इतर मुद्द्यांवरुन विरोधकांनी गदारोळ केला. सभापतींनी सदस्यांना शांत राहण्याचं आवाहन केलं मात्र घोषणा थांबल्या नाहीत त्यामुळे कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित केलं. राज्यसभेतही गदारोळामुळे कामकाज आधी १२ वाजेपर्यंत आणि नंतर २ वाजेपर्यंत स्थगित केलं होतं.
२ वाजता कामकाज सुरु झाल्यानंतर पुन्हा विविध मुद्यांवरुन घोषणाबाजी सुरु राहिल्यानं लोकसभेचं कामकाज ४ वाजेपर्यंत तर राज्यसभेचं कामकाज साडेचार वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं.