इराणकडून डागण्यात आलेली क्षेपणास्त्र रोखल्यानंतर लष्करानं इराणवर हवाई हल्ले केल्याचा दावा इस्रायलनं केला आहे. या हवाई हल्ल्यांनी इराणच्या केरमानशाह प्रांतातल्या लष्करी छावण्यांना लक्ष्य केलं असून क्षेपणास्त्र प्रक्षेपण आणि साठवण सुविधांवर हल्ला केला असल्याचं इस्रायलनं म्हटलं आहे. इराणनं देखील क्षेपणास्त्र आणि ड्रोनद्वारे इस्रायलवर हल्ले केले आहेत.
इराणच्या संसदेनं जगातील सर्वात महत्त्वाचा तेल आणि वायू वाहतूक मार्ग असलेल्या होर्मुझची सामुद्रधुनी बंद करण्याचा प्रस्ताव एकमतानं मंजूर केला आहे. या मार्गावरची सागरी वाहतुक बंद करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचा अंतिम अधिकार इराणच्या सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेकडे आहे. या परिषदेनं अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. दरम्यान, अमेरिकन लष्करी अधिकाऱ्यांनी सैन्याला सज्ज राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. सामुद्रधुनी खुली ठेवण्यासाठी नौदलाद्वारे संघर्षांची तयारी अमेरिका करत असल्याचं वृत्त आहे.
इराण राष्ट्र कोसळत असून अयातुल्ला अली खमेनी आणि इतर लोक इराणमधून पळून जाण्याचा प्रयत्न करत असल्याचं इराणचे निर्वासित युवराज रेझा पहलवी यांनी म्हटलं आहे.
आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्था अर्थात IAEA शी सहकार्य स्थगित करण्यासाठी इराणची संसद एक विधेयक मंजूर करण्याची शक्यता आहे. इराणची शांततापूर्ण कारवायांची कोणतीही योजना नसून IAEA ने त्यांच्या वचनबद्धतेचं पालन केलं नाही आणि ही संस्था राजकीय साधन बनल्याचं इराणच्या संसदेचे सभापती मोहम्मद बाकर कालिबाफ यांनी आज संसदेत म्हटलं आहे. जोपर्यंत इराणला संयुक्त राष्ट्रांच्या अणुऊर्जा संस्थेच्या व्यावसायिक जबाबदारीची ठोस हमी दिली जात नाही तोपर्यंत इराणचं संसद IAEA सोबत इराणचे सहकार्य निलंबित करण्याबाबत एक विधेयक मंजूर करण्याचा विचार करत असल्याचं त्यांनी म्हटलं.
दरम्यान, इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची आज रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यासाठी मॉस्कोला पोहोचले.
रशिया आणि चीनने सुरक्षा परिषदेची आपत्कालीन बैठक बोलावली होती, या बैठकीत तात्काळ आणि बिनशर्त युद्धबंदीची मागणी करणारा ठराव मांडण्यात आला.