इराणची आण्विक आणि संहारक क्षेपणास्त्र क्षमता नष्ट करण्याचं इस्राइलचं लक्ष असल्याचा इशारा इस्राइलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेतन्याहू यांनी दिला आहे. देशाला केलेल्या संबोधनात त्यांनी हा इशारा दिला. तर इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खोमेनी यांना हटवणं हे इस्राइलचं मूळ उद्दिष्ट असल्याचं इस्राइलचे संरक्षण मंत्री इस्राइल कात्झ सांगितलं.
इराणनं इस्राइलमध्ये विविध ठिकाणी हल्ला केला. त्यात एका रुग्णालयाचाही समावेश आहे. या हल्ल्यात १३७ नागरिक जखमी झाल्याचं स्थानिक वृत्तसंस्थेनं सांगितलं. हे आंतरराष्ट्रीय करारांचं उल्लंघन असल्याचं सांगत इस्राइलनं या निर्णयाचा निषेध केला आहे. इस्रायली सैन्यानं इराणच्या अरक हेवी वॉटर न्यूक्लियर रिऍक्टर वर हल्ला केल्याचं वृत्त आहे.
या युद्धात अमेरिकी सैन्य उतरवण्याच्या मुद्द्यावर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मौन बाळगलं आहे. या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर इस्राइल मधल्या अमेरिकन दूतावासानं आपल्या कर्मचाऱ्यांना सुरक्षित ठिकाणी आश्रय घेण्याचे निर्देश दिले आहेत. जगभरातल्या मुस्लिम बहुल २४ देशांनी इस्राइलच्या हल्ल्याचा निषेध करणारं संयुक्त पत्रक प्रसिद्ध केलं आहे.