इराण आणि इस्रायलमध्ये युद्धबंदी जाहीर झाली असूनही इराणने इस्रायलवर क्षेपणास्त्रं डागल्याचा दावा इस्रायलच्या संरक्षण दलांनी केला आहे. इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्रायल काट्झ यांनी इराणवर युद्धबंदीचं उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे. तर, इराणच्या सशस्त्र दलांनी इस्रायलचा हा दावा फेटाळून लावला आहे.
इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमामुळे निर्माण झालेल्या धोक्याला आळा घालण्याचं उद्दिष्ट साध्य झालं असून भविष्यात या युद्धबंदीच्या कराराचं उल्लंघन झाल्यास इस्रायल ते सहन करणार नाही, असं इस्रायल सरकारने युद्धबंदीनंतर जारी केलेल्या निवेदनात म्हटलं होतं. गेले १२ दिवस सुरू असलेल्या या युद्धामुळे इराणमध्ये २२ जूनपर्यंत ८६५ जण मृत्युमुखी पडले. तर ३ हजार ३००हून अधिक जण जखमी झाल्याची माहिती मानवाधिकार वृत्तसंस्थेने दिली आहे. इस्रायलमध्ये २४ नागरिकांचा मृत्यू झाला असून ६०० हून अधिक जखमी झाले आहेत.