इराण आणि इस्रायल यांच्यातला संघर्ष आणखी तीव्र झाला आहे. इस्रायलनं इराणवर काल आणखी तीन टप्प्यांमध्ये हल्ले केले. त्यामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या वाढल्याचं इराणनं म्हटलं आहे. इस्रायलनं इराणच्या राष्ट्रीय पोलिसांचं मुख्यालयावर हल्ला केल्यानं अनेक जण जखमी झाले आहेत. तेहरानमधल्या रणगाडाविरोधी क्षेपणास्त्र प्रकल्पासह चाळीस ठिकाणीही हल्ले करण्यात आले. सततच्या बाँबहल्ल्यांमुळं तेहरान आणि इतर शहरांमध्ये घबराट पसरली आहे.
आत्तापर्यंत सुमारे ५८५ जणांचा मृत्यू झाला, तर तेराशे जण जखमी झाल्याचं इराणचे अधिकारी आणि मानवी हक्क संघटनांचं म्हणणं आहे. दरम्यान, इराणच्या रिव्होल्युशनरी गार्डनं बदला घेऊ असं म्हटलं आहे, तर इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांनी आंतरराष्ट्रीय दबावाला बळी पडणार नसल्याचं म्हटलं आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी या भागात लष्करी तैनातीत वाढ केली आहे आणि इराणनं विनाअट शरण यावं अशी मागणी केली आहे.