हमाससोबतच्या युद्धविरामानंतरही इस्रायलनं गाझा पट्टीवर पुन्हा हवाई हल्ले केले. या हल्ल्यांत एका पत्रकारासह १५ जणांचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे.
हमासनं राफा इथं तैनात इस्रायली सैन्यावर कथितरित्या रणगाडाविरोधी क्षेपणास्त्र डागल्याचा, आणि यात आपल्या दोन सैनिकांचा मृत्यू झाला, त्याला प्रत्यूत्तर म्हणून आपण हा हल्ला केल्याचा दावा इस्रायलनं केला आहे.
हमासनं हा दावा फेटाळला असून, आपण युद्धविराम पाळण्यासाठी वचनबद्ध आहोत, मात्र इस्रायलनंच युद्धविरामाचं उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे. यामुळे युद्धविराम संपुष्टात येण्याची परिस्थिती निर्माण होऊ शकते असा इशाराही हमासनं दिला आहे.
दरम्यान या हल्ल्यानंतरही हमास आणि इस्रायलमधला युद्धविराम कायम असल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे.