गाझा शहरावर ताबा घेण्यासाठी आपण पहिल्या टप्प्यातली लष्करी कारवाई सुरु केल्याचं इस्रायलच्या लष्करानं एका निवेदनाद्वारे घोषित केलं आहे. इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्रायल काट्झ यांनी काल या निर्णयाला मंजुरी दिली असून, या आठवड्याच्या अखेरीला इस्रायलच्या सुरक्षा मंत्रिमंडळाकडून त्याचा आढावा घेतला जाईल, असं यात म्हटलं आहे.
गाझावर मोठा हल्ला करण्याच्या दृष्टीनं शहराबाहेर, विशेषतः झीटौन आणि जबालिया भागात आपलं लष्कर यापूर्वीच कार्यरत झालं असून, या कारवाईसाठी ६० हजार राखीव सैनिकांना तैनात केल्याचं यात म्हटलं आहे. हमासच्या लष्करी पायाभूत सुविधा नष्ट करून त्यांना गाझाच्या इतर नागरिकांपासून वेगळं पाडून कमकुवत करणं, हे आपलं उद्दिष्ट असल्याचं इस्राएलनं म्हटलं आहे.
दरम्यान, इस्राएलच्या युद्धखोरीवर जगभरातल्या अनेक मित्र राष्ट्रांनी टीका केली असून, यामुळे मोठी आपत्ती आणि प्रादेशिक अस्थिरता निर्माण होईल असा इशारा फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रोन यांनी दिला आहे. गाझा मधल्या परिस्थितीबद्दल आंतरराष्ट्रीय रेडक्रॉस संघटनेनंही चिंता व्यक्त केली आहे.
दरम्यान, कतार आणि इजिप्तनं ६० दिवसांचा युद्धविराम आणि निम्म्या ओलिसांची सुटका यासह एक नवीन युद्धबंदी कराराचा प्रस्ताव ठेवला आहे. या प्रस्तावाला आपण मंजुरी दिली आहे, मात्र अद्याप इस्राएलनं त्याला औपचारिक प्रतिसाद दिला नसल्याचं हमासनं म्हटलं आहे. तर, आपल्याला असा संपूर्ण करार हवा आहे, ज्यामध्ये सर्व ओलिसांची सुटका समाविष्ट असेल, असं इस्राएलच्या अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.