इस्रायलबरोबरच्या युद्धविरामाचा एक भाग म्हणून आपल्याकडची शस्त्रं गोठवण्याची किंवा त्यांचा साठा न करण्याची हमासची तयारी आहे, अशी भूमिका हमासच्या वरिष्ठ अधिकाऱ्यानं मांडली आहे. कतारची राजधानी दोहा इथं या युद्धविरामाच्या कराराचा दुसरा आणि अधिक गुंतागुंतीचा टप्पा सुरू होणार आहे, त्या पार्श्वभूमीवर, पॅलेस्टिनी देशाच्या उभारणीच्या प्रक्रियेचा एक भाग म्हणून हमास शस्त्रं खाली टाकायला तयार आहे, असं हमासच्या राजकीय विभागाचे सदस्य बास्सेम नईम यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.
तसंच, याबाबतच्या चर्चेसाठी ५ किंवा १० वर्षं युद्धविरामाची गरज असल्याचं मत मांडलं. अमेरिकेच्या पुढाकारानं झालेल्या या युद्धविरामाच्या दुसऱ्या टप्प्यात युद्धग्रस्त गाझाचं भविष्य ठरवणं, अशी परिस्थिती हाताळण्यासाठी आंतरराष्ट्रीय सुरक्षादल नियुक्त करणं, गाझामध्ये पॅलेस्टाइन समिती स्थापन करणं, गाझाची पुन्हा उभारणी करणं, इस्रायली सैन्य या भागातून मागे घेणं, तसंच हमासचं निःशस्त्रीकरण इत्यादी मुद्द्यांवर चर्चा होणार आहे.