हमासनं उर्वरित सर्व इस्रायली बंधकांना सोडण्यास सहमती दर्शविली आहे. परंतु अमेरिकेच्या शांतता योजनेत नमूद केलेल्या अनेक प्रमुख मुद्द्यांवर पुढील वाटाघाटी करण्याची आपली इच्छा असल्याचं देखील म्हटलं आहे. एका निवेदनात, हमासनं म्हंटलं आहे की बंधकांच्या देवाण-घेवाणीसाठी योग्य अटी पूर्ण झाल्या तर अध्यक्ष ट्रम्प यांच्या प्रस्तावात समाविष्ट असलेल्या सूत्रानुसार सर्व जिवंत आणि मृत इस्रायली कैद्यांना सोपवण्यास ते सहमत आहेत.
परंतु गाझाच्या भविष्याबद्दल आणि पॅलेस्टिनींच्या हक्कांबद्दलच्या इतर मुद्द्यांवर पुढील वाटाघाटी करण्याचा हमासचा प्रयत्न असल्याचं दिसतं. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हमासला, शांतता योजना स्वीकारावी अथवा विनाशाला सामोरं जाण्यासाठी रविवारपर्यंत अंतिम मुदतीचा इशारा दिल्यानंतर काही तासांतच हमासद्वारे ही घोषणा करण्यात आली. हमासनं आपला प्रतिसाद सादर केल्यानंतर, ट्रम्प म्हणाले की हा दहशतवादी गट कायमस्वरूपी शांततेसाठी तयार आहे असा आपला विश्वास आहे. तत्पूर्वी ट्रंप यांनी बंधकांना सुरक्षितपणे आणि लवकर बाहेर काढता येण्याच्या उद्देशानं इस्रायलला गाझावरील बॉम्बहल्ले ताबडतोब थांबवण्याचं आवाहन केलं होतं.