इस्रायलनं इराणवर केलेल्या हल्ल्यांमधे, संरक्षण विभागातले महत्वाचे अधिकारी मारले गेल्यानंतर इराणचे सर्वोच्च नेते आयतुल्लाह खोमिनी यांनी आज नव्या लष्करी अधिकाऱ्यांच्या नेमणूका केल्या. त्यानुसार सशस्त्र दलांचे नवे प्रमुख म्हणून अब्दुल रहीम मौसवी काम करतील. महंमद पकपौर इस्लामिक रिव्होल्यूशनेरी गार्ड कोअरचे नवे कमांडर असतील, तर खतम अल अन्बियाच्या केंद्रीय मुख्यालयाची सूत्रं अली शादमनी यांच्याकडे असतील.
इराणवर काल रात्रभर केलेल्या हल्ल्यांमधे त्यांचे तीन वरिष्ठ लष्करी अधिकारी मारले गेल्याचा दावा इस्रायलच्या संरक्षण दलांनी केला आहे.
इस्रायलच्या लष्करानं आज सकाळी इराणवर अनेक हल्ले केले. इराणमधल्या महत्त्वाच्या आण्विक सुविधांना त्यांनी लक्ष्य केलं. निवासी भागातही हल्ले झाले. त्यात किमान ५० जण जखमी झाल्याचं इराणच्या सरकारी वृत्तसंस्थेनं म्हटलं आहे. गरजेनुसार ही लष्करी मोहिम यापुढंही चालू राहील, असं इस्रायलचे प्रधानमंत्री बेजामीन नेतन्याहू यांनी म्हटलं आहे. त्यावर, इस्रायलला याची गंभीर शिक्षा भोगावी लागेल, असा इशारा इराणचे सर्वोच्च नेते आयतुल्लाह खोमिनी यांनी दिला आहे. इराणनं आपल्या भागात सुमारे १०० ड्रोन्स डागले, त्यापैकी अनेक अडवले, असं इस्रायलच्या लष्करानं म्हटलं आहे.
दरम्यान, या भागातली परिस्थिती चिघळत असल्याबद्दल जगभरातल्या नेत्यांनी चिंता व्यक्त केली आहे. दोन्ही बाजूंनी हल्ले टाळावेत, आणि राजनैतिक मार्गानं प्रश्न सोडवावेत असं आवाहन भारतानं केलं आहे. तर इस्रायलनं इराणविरुद्ध एकतर्फी कारवाई केली आहे, असं अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबिओ यांनी म्हटलं आहे. इस्रायलच्या या हल्ल्यांचा सौदी अरेबिया आणि ओमाननं निषेध केला आहे.