इस्रायल विरुद्धच्या युद्धात शरणागती पत्करण्याचं अमेरिकेचं आवाहन इराणनं फेटाळलं आहे. इराण शरणागती पत्करणार नाही. अमेरिकेनं इराणवर हल्ला केला तर, त्यांना त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खोमेनी यांनी दिला आहे. युद्ध सुरू झालं असून इस्रायलला कोणतीही दया न दाखवता कठोर प्रत्युत्तर द्यावं लागेल, असा इशारा त्यांनी दिला.
या संघर्षाच्या सहाव्या दिवशी इराणमधल्या सेंट्रीफ्यूज आणि शस्त्रास्त्र उत्पादन कारखान्यांवर हल्ले केल्याचा दावा इस्रायलनं केला आहे. इराणनं इस्रायलवर आणखी क्षेपणास्त्रं डागल्यानंतर हे हल्ले केले, त्यात हवाई दलाच्या ५० हून अधिक लढाऊ विमानांनी भाग घेतला, असं इस्रायलच्या संरक्षण दलांनी म्हटलं आहे. आयएईए, अर्थात आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सीनं याला दुजोरा दिला आहे.