इराण आणि इस्रायलमधे सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्र मंत्रालयाने परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी आणि भारतीय नागरिकांना मदत करण्यासाठी २४ तास सुरू असलेला एक नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. तसंच, मदतीसाठी संपर्क क्रमांकही दिले आहेत. ज्या भारतीय नागरिकांना मदतीची आवश्यकता असेल त्यांनी १८०० ११८ ७९७ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा असं आवाहन परराष्ट्र मंत्रालयाने केलं आहे. इराणमध्ये राहणाऱ्या किंवा प्रवास करणाऱ्या भारतीय नागरिकांसाठी भारतीय दुतावासाकडून आपत्कालीन हेल्पलाईन सक्रिय करण्यात आली आहे. त्याशिवाय cons.tehran@mea.gov.in या ईमेलद्वारे देखील नागरिकांना भारतीय दूतावासाशी संपर्क साधता येईल.
दरम्यान, भारतीय दूतावासानं तेहरान इथं शिकणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांना शहराबाहेर स्थलांतरित केलं आहे. इतर भारतीय नागरिकांनीही शहराबाहेर स्थलांतरित व्हावं असं आवाहन परराष्ट्र मंत्रालयानं केलं आहे.
इस्रायलमध्ये तेल अविव इथल्या भारतीय दूतावासानंही इस्रायलमध्ये असणाऱ्या सर्व भारतीय नागरिकांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. भारतीय नागरिकांनी सतर्क राहावं असं आवाहन दूतावासानं केलं आहे, तसंच नागरिकांच्या मदतीसाठी +९७२ ५४ ७५२०७११ आणि +९७२ ५४ ३२७८३९२ हे संपर्क क्रमांक देण्यात आले आहेत. त्याशिवाय cons1.telaviv@mea.gov.in या ईमेलवरही नागरिकांना संपर्क साधता येईल, असं परराष्ट्र मंत्रालयानं आपल्या पत्रकात म्हटलं आहे.