डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

इराणकडून इस्रायलवर क्षेपणास्त्र हल्ला

इस्रायलनं इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर, इराणनं प्रत्युत्तरादाखल इस्त्रायलची राजधानी तेल अवीवला लक्ष्य करत क्षेपणास्त्र हल्ले केले आहेत. या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला तर २० जण जखमी झाल्याचं इस्रायलच्या आपत्कालीन सेवा विभागानं म्हटलं आहे. 

 

या हल्ल्यांनंतर अमेरिकेनं इस्रायलला हवाई संरक्षण प्रणालीसह, नौदलाच्या विनाशिकेची मदत पुरवली असल्याचं वृत्त अमेरिकेच्या प्रसारमाध्यमांनी दिलं आहे. याशिवाय अमेरिकेची लढाऊ विमानंही गस्त घालत असल्याचं वृत्त आहे.

 

दरम्यान, इस्त्रायलनं इराणवर केलेला हल्ला पूर्वनियोजित होता, आणि त्याला अमेरिकेचं पाठबळ होतं असा आरोप संयुक्त राष्ट्र संघातले इराणचे स्थायी प्रतिनिधी, अमीर सईद इरावाणी यांनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत केला. इस्रायलच्या या हल्ल्यात किमान ७८ जण ठार झाल्याचा तर ३२० जण जखमी झाल्याचा दावाही त्यांनी केला. 

 

इस्रायल आणि इराणमध्ये सुरू झालेल्या या संघर्षानंतर जगभरातून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. दोन्ही देशांनी परस्परांविरोधातल्या कारवाया थांबवाव्यात आणि शांततापूर्ण वाटाघाटींच्या मार्गानं तोडगा काढावा असं आवाहन संयुक्त राष्ट्र संघाचे महासचिव अँटोनियो गुटेरेस यांनी केलं आहे.

 

युरोपीय संघ आयोगाच्या अध्यक्ष उर्सुला वॉन डेर लेयन यांनी इस्रायलला स्वसंरक्षणाचा अधिकार असल्याचं म्हटलं आहे. तसंच दोन्ही देशांनी संयम बाळगावा असं आवाहन केलं आहे. 

 

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी इस्रायलची कृती ही संयुक्त राष्ट्रांच्या जाहिरनाम्याचं उल्लंघन असल्याचं म्हणत, मृतांबद्दल शोक व्यक्त केला आहे. पुतीन यांनी दोन्ही देशांच्या प्रमुखांशी यासंबंधी चर्चा केल्याचं क्रेमलिनमधे प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. 

 

कॅनडाचे प्रधानमंत्री मार्क कार्नी यांनी इराणचा अणुकार्यक्रम दीर्घकाळापासून गंभीर चिंतेचं कारण बनला असल्याचं म्हटलं असून, इस्रायलच्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून इराणनं केलेला क्षेपणास्त्र हल्ला हा या क्षेत्रातल्या शांततेला धोका असल्याचं म्हटलं आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.